Nivedan | लोखंडी पूल व नवीन पुलावरील बंद स्ट्रीट लाईट्स तात्काळ सुरू करण्याची मागणी
प्रभाग १७ मधील पुलांवर अधिक प्रकाशमान एलईडी दिवे बसविण्याची आयुक्तांकडे नगरसेवक मयूर बांगरे यांची मागणी
नगर : दर्शक । प्रभाग क्रमांक १७ मधील अमरधामजवळील रेल्वे स्टेशन रोडवरील लोखंडी पूल तसेच त्यालगतच्या नवीन पुलावरील अनेक स्ट्रीट लाईट्स मागील काही दिवसांपासून बंद असल्याने परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, बंद पडलेले दिवे तात्काळ सुरू करण्याबरोबरच अधिक प्रकाशमान एलईडी स्ट्रीट लाईट्स बसविण्याची मागणी नगरसेवक मयूर कन्हैयालाल बांगरे यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अमरधाम परिसरातील रेल्वे स्टेशन रोड हा शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावरून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनांसह भारतीय सैन्याच्या वाहनांची नियमित ये-जा होत असते. तसेच मालधक्का आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधित जड मालवाहू ट्रकांची वाहतूकही मोठ्या प्रमाणावर याच मार्गाने केली जाते. याशिवाय दुचाकी, चारचाकी वाहने तसेच पादचाऱ्यांची दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने या मार्गाचे महत्त्व अधिक आहे.
मात्र, पुलावरील स्ट्रीट लाईट्स बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारमय होत असून वाहनचालकांना मार्गक्रमण करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अंधारामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांकडूनही याबाबत सातत्याने तक्रारी करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या स्ट्रीट लाईट्सची तात्काळ दुरुस्ती करून त्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या समस्या उद्भवू नयेत आणि संपूर्ण परिसर अधिक प्रकाशमान व्हावा यासाठी जुन्या दिव्यांच्या जागी आधुनिक, ऊर्जा कार्यक्षम व अधिक उजेड देणाऱ्या एलईडी स्ट्रीट लाईट्स बसविण्याची मागणीही नगरसेवक मयूर बांगरे यांनी केली आहे.
या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागाला तातडीने आवश्यक सूचना देत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशी अपेक्षा नागरिकांसह नगरसेवक मयूर बांगरे यांनी व्यक्त केली आहे.
