Padmashali Samaj Nagar | प्रसिद्धी नव्हे,तर समाजाला प्रेरणा देण्याचा हेतू
Padmashali Samaj Nagar | पद्मशाली युवाशक्तीचा माणुसकीचा दीपोत्सव; ७ भागांतील १०० वृद्धांपर्यंत पोहोचविला दिवाळीचा फराळ!
Padmashali Samaj Nagar | नगर : दर्शक । दिवाळी म्हणजे आनंदाचा, मांगल्याचा आणि प्रकाशाचा उत्सव! या सणानिमित्त प्रत्येक घरात नवीन कपड्यांची खरेदी, मिठाई व फराळाची तयारी आणि आप्तस्वकीयांच्या भेटीगाठींची लगबग सुरू असते. मात्र, समाजात आजही असे अनेक वंचित, निराधार आणि वृद्ध बांधव आहेत, ज्यांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद वाटून घेणारे कुणी नसते. अशा व्यक्तींच्या आयुष्यातही सणाचा गोडवा आणि आनंद फुलावा, या उदात्त भावनेतून पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टच्या वतीने दिवाळीच्या मंगलपर्वावर फराळ वाटपाचा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला.
दिवाळीच्या दिवशी सकाळी ठीक ९ वाजता पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टचे युवक फराळाची पाकिटे घेऊन नित्यसेवा, पद्मानगर, श्रमिकनगर, तोफखाना, दातरंगे मळा, शिवाजीनगर आणि स्टेशन रोड या सात भागांतील वंचित व वृद्ध व्यक्तींच्या घरी पोहोचले. या उपक्रमांतर्गत एकूण १०० वृद्ध व गरजू व्यक्तींना फराळाचे वाटप करण्यात आले. केवळ फराळाचे वाटप न करता त्यांची आस्थेने विचारपूस करून दिवाळीच्या शुभेच्छा देत आपुलकीचा स्नेहबंध जपण्यात आला.
समाजातील प्रत्येक घटकाला दिवाळीचा आनंद अनुभवता यावा
विशेष म्हणजे, गेल्या ११ वर्षांपासून पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टने ही सेवापरंपरा अखंडितपणे जपली आहे. याविषयी माहिती देताना श्रीनिवास इप्पलपेल्ली यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक घटकाला दिवाळीचा आनंद अनुभवता यावा, या भावनेतून दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो.
फराळ वाटप करताना छायाचित्रे काढण्याबाबत काही जणांकडून संमिश्र मते व्यक्त केली जातात. गरजू व्यक्तींचा स्वाभिमान जपला जाणे निश्चितच महत्त्वाचे आहे. मात्र, या उपक्रमाचे छायाचित्रण करण्यामागे प्रसिद्धी मिळविण्याचा किंवा स्वतःचे मोठेपण सिद्ध करण्याचा कोणताही हेतू नाही. समाजातील इतर सेवाभावी संस्था, युवक मंडळे आणि दानशूर व्यक्तींनीही अशा उपक्रमांची प्रेरणा घेऊन वंचितांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, हाच यामागील एकमेव उद्देश आहे. एखाद्या चांगल्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचल्यास त्यातून अनेकांना प्रेरणा मिळून मदतीचे आणखी हात पुढे येऊ शकतात. प्रसिद्धी मिळविण्यासाठी नव्हे, तर प्रेरणेचा दीप प्रज्वलित करण्यासाठी हा उपक्रम समाजासमोर मांडला जात आहे.
जणू आमच्या माहेरच्या माणसांनीच दिवाळीचा प्रेमळ निरोप आमच्या घरापर्यंत पोहोचविला
या उपक्रमामुळे भारावून गेलेल्या वृद्ध महिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “दरवर्षी दिवाळीच्या दिवशी पद्मशाली युवाशक्तीचे युवक आमच्या घरी येऊन फराळ देतात आणि शुभेच्छा देतात. त्यामुळे जणू आमच्या माहेरच्या माणसांनीच दिवाळीचा प्रेमळ निरोप आमच्या घरापर्यंत पोहोचविला आहे, अशी भावना मनात निर्माण होते.” त्यांच्या या भावपूर्ण प्रतिक्रियेतून उपक्रमाचे खरे समाधान आणि सार्थकता अधोरेखित झाली.
आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःचा आनंद साजरा करताना दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. एखाद्याला दिलेले फराळाचे पाकीट कदाचित आर्थिकदृष्ट्या छोटे असेल; परंतु त्यामागील प्रेम, आपुलकी आणि माणुसकीचे मोल अमूल्य आहे. दिव्यांच्या प्रकाशापेक्षा माणुसकीचा प्रकाश अधिक तेजस्वी असतो, याची प्रचिती या उपक्रमातून आली.
या सेवाभावी उपक्रमात पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टचे योगेश म्याकल, सुमित इप्पलपेल्ली, संजय चिप्पा, प्रवीण कट्टा, सतीश चिंता, अजय म्याना, दीपक गुंडू, श्रीनिवास इप्पलपेल्ली, विनोद म्याना, शुभम बोल्ली, योगेश ताटी, ओम कुरापट्टी, सागर बोगा, सागर आरकल, सागर मेहसुनी, विराज म्याना आणि वेदांत म्याना यांनी सक्रिय सहभाग घेतला.
दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंदाची पणती पेटविणे, हीच खऱ्या अर्थाने दिवाळी! पद्मशाली युवाशक्ती ट्रस्टने गेल्या अकरा वर्षांपासून जपलेली ही सेवापरंपरा केवळ एक उपक्रम नसून, सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा सुंदर आदर्श ठरत आहे.
