Social Work | बोल फाउंडेशनतर्फे भिंगारमधील १५० हून अधिक कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंदोत्सव
Social Work | गरजू महिलांना नवीन साड्यांचे, तर कुटुंबांना दिवाळी मिठाईचे वाटप; सामाजिक बांधिलकीतून माणुसकीचा दीप प्रज्वलित
Social Work | नगर : दर्शक । सामाजिक बांधिलकी जपत ‘ब्रेड ऑफ लाईफ’ व बोल फाउंडेशनच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही भिंगार येथील इंदिरानगर सेवावस्तीमध्ये दिवाळी आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत वस्तीत राहणाऱ्या १५० हून अधिक कुटुंबांना दिवाळीच्या मिठाईचे पुडे, तसेच १५० हून अधिक महिलांना नवीन साड्यांचे वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्यात आला. सणाचा आनंद समाजातील गरजू आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमासाठी दिवाळीच्या मिठाईच्या पुड्यांचे वाटप श्री. अरविंद कोथापल्ली यांच्या टर्न अराउंड ग्लोबल सर्व्हिसेस या संस्थेच्या सौजन्याने करण्यात आले. तसेच भिंगार येथील रहिवासी श्री. दिलीप लालचंद मुनोत यांच्या सौजन्याने इंदिरानगर सेवावस्तीतील महिलांना नवीन साड्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बोल फाउंडेशनचे चेअरमन जोसेफ पाटोळे यांनी दिवाळीचा आनंद समाजातील गरीब, गरजू आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचला पाहिजे. सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाशी आपुलकीचे आणि मानवतेचे नाते जोडले गेले पाहिजे. याच सामाजिक भावनेतून बोल फाउंडेशन सातत्याने विविध उपक्रम राबविण्यासाठी कार्यरत असल्याचे सांगितले.
बोल फाउंडेशनच्या सचिव शोभा पाटोळे, फाउंडेशनचे उपाध्यक्ष अमित पाटोळे, श्रद्धा पाटोळे, काव्या पाटोळे व आरुष पाटोळे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मिठाईचे पुडे व साड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच स्वयंसेवक अनिकेत पाटोळे,आरती पाटोळे, अंकिता पाटोळे, नीतीन पाटोळे आणि इतर स्वयंसेवकांच्या हस्ते उर्वरित गरजू कुटुंबांपर्यंतही दिवाळी भेट पोहोचविण्यात आली.
यावेळी इंदिरानगर सेवावस्तीतील स्वयंसेवक भाऊसाहेब लक्ष्मण गवळी ऊर्फ अण्णाभाऊ गवळी यांनी बोल फाउंडेशन, देणगीदार आणि उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच सेवावस्तीतील सेविका आरती सदलापुरकर यांनीही फाउंडेशनच्या या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हा दिवाळी आनंदोत्सव यशस्वी करण्यासाठी नंदा रॉय, सीमा क्षीरसागर, मोनिका वैराळ, वर्षा घोरपडे, सुनीता गवळी, आरती सदलापुरकर, रुपाली भारत ठोकळ, सोनाली उमाप, धनंजय घोरपडे, विनोद उमाप आणि अण्णाभाऊ गवळी यांच्यासह बोल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले.
सण केवळ स्वतःच्या कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू कुटुंबांसोबत आनंद वाटून घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. दिवाळीच्या निमित्ताने मिळालेल्या या भेटींमुळे इंदिरानगर सेवावस्तीतील कुटुंबांच्या सणाचा आनंद द्विगुणित झाला.
