रहेमत सुलतान फाउंडेशनच्या मुस्लिम वधू वर मेळाव्यास भरभरून प्रतिसाद
शिक्षण संपत्ती आणि वाढत्या अपेक्षा विवाहातील सर्वात मोठे अडथळे – युनुस तांबटकर
वधू वर | नगर : दर्शक । समाजात शिक्षणाचा प्रसार, आर्थिक प्रगती
आणि आधुनिक विचारसरणी वाढत असताना विवाह जुळविण्याची
प्रक्रिया मात्र दिवसेंदिवस अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे चित्र दिसून
येत आहे. एकेकाळी स्वभाव, संस्कार आणि कुटुंबातील मूल्यांना महत्त्व
दिले जात होते; मात्र आज शिक्षण, नोकरी, पगार, संपत्ती आणि सामाजिक
प्रतिष्ठा हेच विवाहाचे प्रमुख निकष बनले आहेत.असे प्रतिपादन
रहेमत सुलतान फाऊंडेशनचे अध्यक्ष युनुसभाई तांबटकर यांनी केले.
रहेमत सुलतान मॅरेज ब्युरोच्या वतीने मुस्लिम वधु वर मेळाव्याचे
राज्यस्तरीय आयोजन करण्यात आले होते.
मेळाव्यास शेकडो पालकांनी हजेरी लावली
यावेळी संस्थेचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, जीवन फाउंडेशनचे
अध्यक्ष आरिफ सय्यद,राजाभैय्या, मुस्कान असोसिएशनचे
अध्यक्ष शफकत सय्यद, एडवोकेट हनीफ बाबूजी, जफर खान,
गुल्लुमामु, सदाकत सय्यद, आसिफ दुलेखान, अभिजीत वाघ,
जावेद मास्टर, अबरार शेख, फिरोज शेख आदी उपस्थित होते.
यावेळी लोकांनी वधूवरांचे बायोडाटा एकमेकांना आदान प्रदान केले
व मॅरेज ब्युरो मध्ये जमा केले. काही लोकांनी जागेवरच मुला-मुलींना
बघण्याचा कार्यक्रम उरकून घेतला. या वधू वर मेळाव्यास
शेकडो पालकांनी हजेरी लावली.व उपक्रमा बद्दल समाधान व्यक्त केले.
पुढे बोलतांना तांबटकर म्हणाले की,सध्या अनेक पालक आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जोडीदार शोधताना प्रथम शिक्षण, नोकरी आणि आर्थिक स्थितीचा विचार करतात. मुलगा चांगल्या नोकरीत असावा, त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम असावे, स्वतःचे घर, व्यवसाय किंवा भरपूर मालमत्ता असावी, अशी अपेक्षा केली जाते. दुसरीकडे, अनेक ठिकाणी मुलगा स्थिर नोकरीत नसला तरी त्याला मात्र उच्चशिक्षित आणि नोकरी करणारी मुलगी हवी असते. काही कुटुंबे एकुलती एक मुलगी किंवा भरपूर संपत्ती असलेल्या कुटुंबातील मुलीला प्राधान्य देतात.
यामुळे अनेक वेळा योग्य शिक्षण असलेला मुलगा मिळत नाही, तर कधी उच्चशिक्षित मुलीला तिच्या अपेक्षेनुसार मुलगा मिळत नाही. दोघेही उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असले तरी एकमेकांकडून असलेल्या अवास्तव अपेक्षांमुळे विवाह जुळणे कठीण होते. अपेक्षित जोडीदाराच्या शोधात वर्षानुवर्षे वेळ निघून जातो आणि लग्नाचे वय वाढते.
वय वाढल्यानंतर अनेकांना परिस्थितीशी तडजोड करून विवाह करावा लागतो. मात्र परस्पर समज, संवाद आणि विश्वास याऐवजी केवळ तडजोडीवर उभे राहिलेले नाते अनेकदा टिकवणे कठीण जाते. परिणामी, वैवाहिक जीवनात मतभेद वाढण्याची आणि नाते तुटण्याची शक्यता निर्माण होते.
मनोगत व्यक्त करताना जिवन फाऊंडेशनचे अध्यक्ष सय्यद आरिफ म्हणाले की,समाजातील जाणकारांचे मत आहे की, शिक्षण आणि आर्थिक स्थैर्य महत्त्वाचे असले तरी त्यापेक्षा स्वभाव, परस्पर आदर, संस्कार, समंजसपणा, जबाबदारीची जाणीव आणि एकमेकांना समजून घेण्याची तयारी या गुणांना अधिक महत्त्व दिले गेले पाहिजे. विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबांचा आणि दोन विचारांचा मिलाफ असतो. त्यामुळे अवास्तव अपेक्षा कमी करून वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारल्यास अनेक तरुण-तरुणींचे विवाह वेळेत होण्यास मदत होईल आणि वैवाहिक जीवनही अधिक आनंदी व यशस्वी होऊ शकेल असे नमुद केले.
यावेळी मुला मुलींच्या आलेल्या पालकांनी असे वधू वर मेळावे लवकर लवकर घेण्यात यावे जेणेकरून लवकरात लवकर मुलांचे लग्न जोडविण्यात यश मिळेल असे नमूद केले.
आभार शफकत सय्यद यांनी मानले.
