Samarth School | कापरेकरांच्या ६१७४ मॅजिक अंकातून गणिताची गोडी रुजविण्याचा श्री समर्थ विद्यामंदिरचा अभिनव उपक्रम
Samarth School | “गणित हा सर्व विषयांची जननी असून जिज्ञासा, तर्कशक्ती आणि संशोधन वृत्ती विकसित करणारा विषय आहे” – प्रा. डॉ. सचिन राळेगणकर
Samarth School | नगर : दर्शक ।
श्री समर्थ विद्यामंदिर माध्यमिक विभागात जागतिक कीर्तीचे गणितज्ञ कै. दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त “कापरेकर कॉर्नर – ६१७४” या विशेष गणितीय उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सचिन राळेगणकर यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन मा. स्वप्निलजी कुलकर्णी होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील कानडे, शिक्षिका शारदा होशिंग, योगिता कुलकर्णी, जयश्री काळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शारदा होशिंग यांनी कै. दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांच्या जीवनकार्याचा व जागतिक पातळीवर गाजलेल्या ६१७४ या कापरेकर स्थिरांकाचा परिचय करून दिला.
प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सचिन राळेगणकर यांनी उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “गणित हा सर्व विषयांची जननी आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी तर्कशक्ती, विश्लेषण क्षमता आणि समस्यांचे निराकरण करण्याची वृत्ती आवश्यक असते आणि या सर्व गुणांचा पाया गणित घालते. गणिताची भीती न बाळगता त्याचा आनंदाने अभ्यास केल्यास प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये संशोधक दडलेला आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित सराव, निरीक्षण आणि प्रश्न विचारण्याची सवय लावण्याचे आवाहन केले.
पुढे बोलताना प्रा. राळेगणकर म्हणाले की, कै. दत्तात्रेय रामचंद्र कापरेकर यांनी अत्यंत मर्यादित साधनसामग्रीतून जागतिक स्तरावर मान्यता मिळवणारे संशोधन केले. त्यांची जिज्ञासू वृत्ती, सातत्यपूर्ण परिश्रम, चिकाटी आणि ज्ञानाची ओढ ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे. शाळेत उभारण्यात आलेला ‘कापरेकर कॉर्नर – ६१७४’ हा विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आकर्षण निर्माण करून नव्या संशोधनवृत्तीला चालना देणारा उपक्रम ठरेल. अशा प्रयोगशील उपक्रमांमधूनच भविष्याचे वैज्ञानिक, गणितज्ञ आणि संशोधक घडतील.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वप्निल कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, “कापरेकर स्थिरांक ६१७४ ही केवळ एक संख्या नसून गणितातील अद्भुत सौंदर्य आणि संशोधनाची प्रेरणा आहे. कापरेकर यांनी आपल्या बुद्धिमत्ता, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासातून जगाला भारतीय गणिताची वेगळी ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी पाठांतरापेक्षा संकल्पना समजून घेत विचार करण्याची सवय लावली, तर गणित सहज आणि आनंददायी वाटेल. शाळेने सुरू केलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.
यावेळी मुख्याध्यापक सुनील कानडे यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीची तसेच विविध गुणवर्धक उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध गणितीय युक्त्या समजावून सांगत गणिताचा अभ्यास अधिक सोपा आणि रंजक कसा करता येईल याचे मार्गदर्शन केले. तसेच जयश्री काळे यांनी गणितीय दिनदर्शिकेच्या माध्यमातून विविध गणितीय समीकरणे आणि संकल्पना विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडल्या.
Samarth School | संशोधनाची प्रेरणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मोठी चालना
कार्यक्रमात सन्माननीय अतिथी व अध्यक्षांचा परिचय योगिता कुलकर्णी यांनी करून दिला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. काळे यांनी ओघवत्या शैलीत केले. कार्यक्रमाच्या शेवटी शारदा होशिंग यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. ‘कापरेकर कॉर्नर – ६१७४’ या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी उत्सुकता, संशोधनाची प्रेरणा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यास मोठी चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
