Fusion | श्रीलंकेतील ‘फ्युजन’ या वार्षिकात अबुजर शेख यांची विशेष मुलाखत
Fusion | सीए परीक्षार्थी अबुजर शेखची आंतरराष्ट्रीय भरारी! सीए विद्यार्थी संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय वार्षिकात मुलाखत

Fusion | नगर : दर्शक । नगरच्या सीए विद्यार्थी संघटनेचे सचिव (२०२५-२६) आणि ‘लक्ष्य’ या आंतरराष्ट्रीय मासिकाचे मुख्य संपादक अबुजर शेख हे बीएनबी मेडिकल डिस्ट्रिब्युटर्सचे संस्थापक समीर शेख यांचे सुपुत्र असून, त्यांच्या नेतृत्वाखाली ‘लक्ष्य’ मासिकाच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कार्याची आता आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
‘लक्ष्य’ मासिकाची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाल्यानंतर त्यांच्या प्रवासात आणखी एक ऐतिहासिक टप्पा जोडला गेला आहे.
श्रीलंकेतील सीए विद्यार्थी संघटनेच्या ‘फ्युजन’ या वार्षिकाच्या २२व्या आवृत्तीत अबुजर शेख यांची विशेष मुलाखत प्रकाशित झाली आहे. ‘फ्युजन’ हे वार्षिक श्रीलंका तसेच शेजारील देशांतील असामान्य प्रतिभा, उल्लेखनीय कार्य आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ओळखले जाते.
सीए विद्यार्थी संघटना, श्रीलंकेचे अध्यक्ष थिलिना पिन्सारा आणि ‘फ्युजन’चे संपादकीय प्रमुख नास्बी अहमद यांनी अबुजर शेख यांची विशेष मुलाखत घेतली असून, ही मुलाखत ‘फ्युजन’च्या २२व्या आवृत्तीत प्रकाशित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, श्रीलंका तसेच शेजारील देशांतील असामान्य प्रतिभावंतांना व्यासपीठ देणाऱ्या या आंतरराष्ट्रीय वार्षिकात भारतामधून प्रथमच अबुजर शेख यांना स्थान मिळाले आहे.
तसेच, सीए विद्यार्थी संघटनेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या विद्यार्थ्याची मुलाखत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वार्षिकात प्रकाशित झाली आहे. त्यामुळे हा सीए विद्यार्थी संघटनेच्या इतिहासातीलही एक उल्लेखनीय ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.
या मुलाखतीमध्ये अबुजर शेख यांनी ‘लक्ष्य’च्या संकल्पनेपासून ते वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समधील नोंदीपर्यंतच्या प्रवासाबद्दल, तसेच या कार्यामागील जबाबदारी, आव्हाने आणि अनुभवांविषयी संवाद साधला आहे.
नगरमधून सुरू झालेला हा प्रवास आता भारताच्या सीमा ओलांडून श्रीलंकेपर्यंत पोहोचला असून, ‘लक्ष्य’ची ओळख आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उमटली आहे. नगरच्या मातीतून सुरू झालेल्या या उल्लेखनीय प्रवासाची आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली दखल ही केवळ अहिल्यानगरसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
