November 9, 2026

Nagar Vatchnalay | रंगात दंगले चिमुकले हात; जिल्हा वाचनालयाच्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

image - 2026-11-09T195141.706

Nagar Vatchnalay | स्वातंत्र्य दिनानिमित्त सुमारे १,१०० विद्यार्थ्यांचा सहभाग; १८ ऑगस्टला पारितोषिक वितरण सोहळा

Nagar Vatchnalay | नगर : दर्शक । स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून अहिल्यानगर जिल्हा वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय चित्रकला स्पर्धेला यंदा विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कोऱ्या कागदावर आपल्या कल्पनाशक्तीला रंगांची सुंदर साथ देत चिमुकल्यांनी देशभक्ती, निसर्ग, सामाजिक संदेश आणि विविध विषयांवरील आकर्षक चित्रे साकारली. बाई इचरजबाई फिरोदिया शाळेत पार पडलेल्या या स्पर्धेत सुमारे १,१०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत स्पर्धेला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले.

           स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष वैद्य राजा ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष दिलीप पांढरे, सहकार्यवाह राहुल तांबोळी, संचालिका शिल्पा रसाळ, स्पर्धेचे समन्वयक किरण आगरवाल, कवी चंद्रकांत पालवे, लेखक गणेश भगत, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, ग्रंथपाल अमोल इथापे, सहाय्यक ग्रंथपाल नितीन भारताल, पल्लवी कुकडवाल, वर्षा जोशी, संजय गाडेकर, आर्यन मडूर, ओम केदारे आदी मान्यवर उपस्थित होते.

              यावेळी अध्यक्ष वैद्य राजा ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “चित्रकला ही केवळ रंगांची उधळण नसून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, सर्जनशीलतेला आणि संवेदनशीलतेला दिशा देणारी प्रभावी कला आहे. पुस्तक वाचनासोबतच चित्रकला, लेखन आणि सांस्कृतिक उपक्रमांमधून मुलांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडते. जिल्हा वाचनालय अशा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत असून भविष्यातही अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल,” असे त्यांनी नमूद केले.

             स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेत विविध विषयांवर कल्पक आणि आकर्षक चित्रे रेखाटली. पालक व शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत अशा उपक्रमांचे स्वागत केले.

          दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक किरण आगरवाल यांनी दिली.