Podar School Nagar | परीकथांच्या विश्वापासून माणुसकीच्या मूल्यांपर्यंत ; पोदार स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
Podar School Nagar | ‘फेअरी टेल्स’ आणि ‘बीइंग ह्युमन’ संकल्पनांतून विद्यार्थ्यांचा कलाविष्कार; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
Podar School Nagar | नगर : दर्शक । पोदार इंटरनॅशनल स्कूल, नगरचे दहावे वार्षिक स्नेहसंमेलन ३ व ४ नोव्हेंबर रोजी सावेडी येथील मौली सभागृहात उत्साहात पार पडले. दोन दिवस चाललेल्या या सांस्कृतिक सोहळ्यात विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, संगीत आणि अभिनयातून कलागुणांचे दर्शन घडविले. प्राथमिक विभागासाठी ‘फेअरी टेल्स – व्हेअर स्टोरीज डान्स, ड्रीम्स फ्लाय अँड मॅजिक कम्स अलाइव्ह’, तर माध्यमिक विभागासाठी ‘बीइंग ह्युमन – बी द रिझन फॉर समवन टू बिलीव्ह इन गुडनेस’ या संकल्पना मांडण्यात आल्या होत्या.
३ नोव्हेंबर रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झाला. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त रेवनाथ विसले आणि जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच पोदार मांजरीच्या प्राचार्या मीनल वैद्य, पुनावालाच्या रिंकू अग्रवाल, खोपोलीच्या वैशाली रणसुभे आणि वाकडचे अग्नेल कारव्हॅलो उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सिंड्रेला, स्नो व्हाइट, अलादीन आणि जंगल बुक या परीकथांवर आधारित नृत्य व नाटिका सादर करून रंगमंचावर जादुई विश्व साकारले.
४ नोव्हेंबर रोजी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम झाला. यावेळी लष्करी वाहनांच्या गुणवत्ताहमीचे पर्यवेक्षण करणारे ब्रिगेडियर राजीव चावला व सौ. प्रियंका चावला तसेच शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यासह पोदार रोहकलचे विशाल जाधव, दौंडच्या स्वाती कणसे, पुणे हबचे जनरल मॅनेजर मनोज काळे, वाघोलीचे मनीष शर्मा, हडपसरचे ए. के. सिंह, तळेगावचे सुधांशू नायक, उंड्रीचे संजीव भारद्वाज, नाशिकचे डॉ. मनोहर महाजन, चाळीसगावचे अजय घोरपडे, शिरूरचे नीरज राय, इगतपुरीचे संदेश खताळ आणि रयत इंग्लिश मीडियम स्कूल, साताऱ्याचे मॅनेजर महेंद्र काटकर उपस्थित होते.
दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली. माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी माणुसकी, प्रेम, दया, सहानुभूती, समानता, परोपकार आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर आधारित सादरीकरण केले. गरजूंना मदत करणे, दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होणे आणि छोट्या कृतीतून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करणे, असे संदेश प्रभावीपणे मांडले.
प्राचार्य मंगेश जगताप यांनी मार्गदर्शन करताना परीकथांमधून विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती, धैर्य, मैत्री आणि प्रामाणिकपणा यांसारखी मूल्ये रुजतात, असे सांगितले. शिक्षणाचा उद्देश केवळ शैक्षणिक यश नसून संवेदनशील व जबाबदार नागरिक घडविणे हा आहे. ‘चांगुलपणावर विश्वास ठेवण्याचे कारण कोणासाठी तरी बना’ हा संदेश विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात आचरणात आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे रेवनाथ विसले यांनी सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, कल्पनाशक्ती आणि संघभावना विकसित होत असल्याचे सांगून सादरीकरणाचे कौतुक केले. ब्रिगेडियर राजीव चावला यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी मूल्ये जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजकल्याणासाठी करावा, असा संदेश त्यांनी दिला.
माध्यमिक विभागात इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत विशेष गुणवत्ता मिळविलेल्या तसेच विविध परीक्षा व क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य मंगेश जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेच्या वार्षिक अहवालाचे वाचनही करण्यात आले.
प्राथमिक विभागाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले. या विभागाचा समारोप हेड बॉय आयुष जगताप व हेड गर्ल प्रांजल चेडे यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. माध्यमिक विभागाचा समारोप स्पोर्ट्स कॅप्टन दर्श देसारडा व हेड बॉय रुद्र आहेर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या शगुफ्ता काझी, प्रशासन व्यवस्थापक आशुतोष नामदेव, ॲडमिन ऑफिसर नितीन गवांदे, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि हाऊसकीपिंग स्टाफ यांनी परिश्रम घेतले. कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देतानाच विद्यार्थ्यांमध्ये माणुसकीची मूल्ये रुजविणारा हा दहावा स्नेहसंमेलन सोहळा संस्मरणीय ठरला.
