Dindi | यशोदा नगरात संत बहिणाबाई पायी दिंडीचे जल्लोषात स्वागत ; ३०० वारकऱ्यांना महाप्रसादाचे भोजन
“वारी ही आधुनिक जीवनातील तणावावर नैसर्गिक उपचार; आनंदाचा खरा मार्ग अंतर्मनातच” – हभप भाऊसाहेब तुपे महाराज
नगर : दर्शक । संत परंपरेचा वारसा जपत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण
करणाऱ्या संत बहिणाबाई पायी दिंडीचे सावेडी उपनगरातील पाईपलाईन
रोडवरील यशोदा नगर येथे सोमवारी नागरिकांच्या वतीने अत्यंत
उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशे, बँड पथक,
टाळ-मृदंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात
दिंडीचे आगमन झाले. परिसरातील नागरिकांनी वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी
करून त्यांचे स्वागत केले. यावेळी सुमारे ३०० वारकरी या दिंडीत सहभागी झाले होते.
यावेळी आयोजित स्वागत सोहळ्यात हभप भाऊसाहेब तुपे
महाराज यांनी उपस्थित वारकरी आणि नागरिकांना मार्गदर्शन केले.
आधुनिक काळातील वाढती धावपळ, ताणतणाव आणि स्पर्धेच्या वातावरणात
वारीचे महत्त्व अधिक अधोरेखित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून माणसाच्या मनाला शांती,
समाधान आणि सकारात्मक ऊर्जा देणारी जीवनशैली असल्याचे
त्यांनी आपल्या प्रभावी प्रवचनातून स्पष्ट केले.
“आजचा माणूस मोबाईल, सोशल मीडियाचे आकर्षण,
कामाचा वाढता ताण, स्पर्धेची धावपळ आणि भौतिक सुखांच्या मागे
धावत असताना स्वतःपासूनच दूर गेला आहे. अशा परिस्थितीत वारी
माणसाला स्वतःशी पुन्हा एकदा जोडण्याचे कार्य करते. काही दिवस
संसारातील चिंता, व्यवसायाचा ताण आणि दैनंदिन धकाधकीपासून दूर
राहून वारकरी विठ्ठलनामात रमतो. त्या नामस्मरणातून मनाला खरी विश्रांती मिळते.
त्यामुळे वारी ही केवळ श्रद्धेचा प्रवास नसून मानसिक शुद्धीकरणाची आणि
आत्मिक समाधानाची एक महान साधना आहे,”
असे प्रतिपादन हभप भाऊसाहेब तुपे महाराज यांनी केले.
पुढे बोलताना तुपे महाराज म्हणाले, “आज मानसिक तणाव,
नैराश्य आणि अस्वस्थता या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
त्यावर औषधांबरोबरच मन प्रसन्न ठेवणारे संस्कारही आवश्यक आहेत.
वारी माणसाला समता, बंधुभाव, संयम, सेवा आणि प्रेमाची शिकवण देते.
येथे कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण विठ्ठलाचे लेकरू म्हणून एकत्र चालतात.
आनंद बाहेरच्या गोष्टींमध्ये नसून तो आपल्या अंतर्मनात आहे.
तो शोधण्यासाठी काही काळ थांबणे, स्वतःकडे पाहणे आणि
ईश्वरनामाशी नाते जोडणे आवश्यक आहे. त्यामुळे वारी ही आधुनिक
जीवनात मानसिक आरोग्यासाठी नैसर्गिक उपचार ठरत आहे.”
यशोदा नगरातील नागरिकांनी दिंडीचे अत्यंत भक्तिमय
वातावरणात स्वागत केले. बँड पथकाच्या सुरावटी, टाळ-मृदंगाचा गजर
आणि विठ्ठलनामाच्या घोषात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
स्वागतासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वारकऱ्यांचे औक्षण करून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
तसेच दिंडीतील सर्व वारकऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
स्वागत सोहळ्यानंतर भुजबळ परिवाराच्या वतीने दिंडीत सहभागी
झालेल्या सर्व ३०० वारकऱ्यांसाठी निष्ठेने महाप्रसादाच्या भोजनाची
व्यवस्था करण्यात आली. वारकऱ्यांनी भोजनाचा लाभ घेत आयोजकांचे
मनापासून आभार व्यक्त केले. सेवाभावातून आयोजित करण्यात आलेल्या
या उपक्रमामुळे उपस्थितांनी भुजबळ परिवाराचे विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमाला सोन्याबापू भुजबळ, बाळासाहेब भुजबळ, जवाहर भुजबळ, माऊली गायकवाड, रघुनाथ औटी, बबन काशीद, आशिष ताकपेरे, बाबू ताकपेरे, दिलीप शिंदे, शिवाजी दळवी, राजेंद्र ताकपेरे, संपत मदने, प्रशांत काळे, श्रीपाद वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी वारकऱ्यांच्या सेवेत सक्रिय सहभाग घेतला.
यावेळी राजश्री भुजबळ, ओंकार-मयुरी भुजबळ, राजू-योगिता भुजबळ, सौरभ-साक्षी भुजबळ, अजिंक्य-शिवानी भुजबळ यांच्यासह संपूर्ण भुजबळ परिवाराने वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. भक्तिभाव, सेवावृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम घडवून आणणारा हा स्वागत सोहळा वारकरी संप्रदायाच्या सेवाभावाची आणि समाजातील ऐक्याची प्रेरणादायी परंपरा अधिक दृढ करणारा ठरला.
