July 16, 2026

Savedi | वारकरी परंपरा ही समाजाला समतेसह संस्कारांची दिशा देणारी जीवनशाळा’ : महापौर ज्योतीताई गाडे

IMG_20260716_072838

Savedi | शिंदवड ते पंढरपूर पायी दिंडीचे श्री स्वामी समर्थ मंदिरात भव्य स्वागत

Savedi | नगर : दर्शक । नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील

श्रीक्षेत्र शिंदवड येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या

श्री निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडीचे सावेडी उपनगरातील

गुलमोहर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरात भाविकांच्या वतीने

अत्यंत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. टाळ-मृदुंगांच्या

निनादात, “ज्ञानोबा-तुकाराम” आणि “विठ्ठल विठ्ठल”च्या अखंड गजरात

दिंडी मंदिर परिसरात दाखल होताच संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून गेला.

          मंदिरातील भाविकांनी दिंडीतील जि वनेश्वर काळुबाबा

रथाचे पूजन करून विणेकरी हभप भाऊसाहेब मोरे यांची पाद्यपूजा केली.

मंदिराच्या सेवेकरी बांधवांनी रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या, फुलांची सजावट

करून दिंडीचे स्वागत केले. दिंडीचे आगमन होताच फटाक्यांची

आतषबाजी करण्यात आली, तर महिलांनी रथातील पादुकांचे औक्षण

करून विठ्ठलनामाच्या गजरात आरती केली. यावेळी

हभप अनिरुद्ध निर्मळ, हभप भाऊसाहेब मोरे, हभप बापूभाऊ बस्ते,

हभप गोविंद बस्ते,हभप विलास बस्ते, हभप नामदेव बस्ते,

हभप राकेश बस्ते, भाविक उपस्थित होते.

         रात्री मंदिर परिसरात समस्त शिंदवड ग्रामस्थ व वारकरी

परिवाराच्या वतीने संगीत हरिपाठ सादर करण्यात आला.

त्यानंतर झालेल्या कीर्तनात हभप वसंत महाराज थोरमिसे

यांनी “अवघा रंग एक झाला” या अभंगाच्या माध्यमातून आषाढी वारीचे

आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व उलगडून सांगितले.

तसेच अमोल गाडे यांनी सांगितले की वारी माणसाला स्वावलंबन, नम्रता,

समता आणि आत्मपरीक्षणाची शिकवण देते. जात, पंथ, श्रीमंती-गरिबीचे

भेद विसरून सर्वांना एकाच विठ्ठलभक्तीच्या सूत्रात बांधणारी वारी ही

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची अनमोल परंपरा असल्याचे ते म्हणाले.

वारकरी संप्रदायाने शतकानुशतके समाजात समता, बंधुभाव, शिस्त आणि सेवाभावाचे संस्कार रुजवले

            यावेळी बोलताना महापौर ज्योतीताई गाडे म्हणाले की “आषाढी वारी ही केवळ पंढरपूरच्या दिशेने चालणारी पायी यात्रा नसून ती माणसाच्या अंतर्मनाला शुद्ध करणारी अध्यात्माची वाट आहे. वारकरी संप्रदायाने शतकानुशतके समाजात समता, बंधुभाव, शिस्त आणि सेवाभावाचे संस्कार रुजवले आहेत. टाळ, मृदुंग आणि हरिनामाच्या गजरातून समाजाला एकत्र आणण्याचे कार्य वारी आजही प्रभावीपणे करत आहे. ही परंपरा जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.”असे सौ.गाडे यांनी स्पष्ट केले 

             “आजच्या धकाधकीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात माणूस मानसिक ताणतणावात अडकत चालला आहे. अशा काळात वारकरी संप्रदाय संयम, सहकार्य, परस्पर सन्मान आणि निःस्वार्थ सेवेचे मौल्यवान धडे देतो. विठ्ठलभक्तीची ही अखंड परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेतला पाहिजे. अशा दिंड्यांचे स्वागत करणे म्हणजे आपल्या संस्कृतीचा आणि संतपरंपरेचा सन्मान करण्यासारखे आहे.”असे हभप भाऊसाहेब मोरे यांनी म्हटले आहे.

           कीर्तनानंतर सर्व वारकऱ्यांना मिष्टान्न भोजनाचा प्रसाद देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंदिराच्या सर्व सेवेकरी बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. मंदिराने केलेल्या आदरातिथ्याबद्दल शिंदवड येथील दिंडीतील वारकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.