July 13, 2026

Nagar Cricket | कामाच्या तणावावर क्रिकेटचा दिलासा

image - 2026-07-13T204711.655

Nagar Cricket | कामाच्या तणावावर क्रिकेटचा दिलासा; ‘फ्रेंड्स मॉन्सून क्रिकेट लीग – कॉर्पोरेट’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Nagar Cricket | नगर : दर्शक ।

कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचारी वर्गाला दैनंदिन कामाच्या

तणावातून दिलासा मिळावा, त्यांच्यामध्ये सांघिक भावना, मैत्री

आणि निरोगी स्पर्धेची जाणीव वाढावी या उद्देशाने ‘फ्रेंड्स मॉन्सून

क्रिकेट लीग – कॉर्पोरेट’ या अनोख्या क्रिकेट स्पर्धेचे रविवारी

उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले.

या स्पर्धेमध्ये सहा संघांचा सहभाग आहे.

           या स्पर्धेचे आयोजन तेजस करमरकर, प्रकाश राठोड

आणि चैतन्य खोलगडे यांनी केले असून, साईदीप हिरोजचे

अध्यक्ष संदीप घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

         स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी माजी रणजी क्रिकेटपटू अनुपम संकलेचा

तसेच उद्योजक वसीम हुंडेकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना, कॉर्पोरेट क्षेत्रातील

धकाधकीच्या जीवनात मानसिक व शारीरिक आरोग्य

जपण्यासाठी अशा क्रीडा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले.

           स्पर्धेच्या पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यांमध्ये नगर डिस्ट्रीक्ट सिनियर विरुद्ध क्रिकेट स्टार करंजी आणि नगर चॅम्पियन्स विरुद्ध शिवराज ॲड्वोकेट्स वॉरियर असे सामने खेळवण्यात आले. यामध्ये नगर डिस्ट्रीक्ट सिनियर आणि शिवराज ॲड्वोकेट वॉरियर यांनी अनुक्रमे विजय मिळवला.

           ही लीग विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी वर्गासाठी असून, सामने दर शनिवार आणि रविवारी आयोजित करण्यात येणार आहेत. आठवडाभराच्या कामाच्या तणावातून मुक्तता मिळावी, सहकाऱ्यांमध्ये सुसंवाद व टीमवर्क वाढावे आणि खेळाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

          स्पर्धेला विविध कंपन्यांतील खेळाडू व क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आगामी काळात या लीगचे अधिक व्यापक स्वरूपात आयोजन करून कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकाधिक कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.