MSCIT | राही कॉम्प्युटर्समध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; राज्यात प्रथम आलेल्या कु. शेख उम्मे ऐमनचा विशेष सत्कार
MSCIT | नगर : दर्शक । ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण, संगणक साक्षरता आणि कौशल्याधारित प्रशिक्षण देत त्यांना रोजगारक्षम बनविण्याचे उल्लेखनीय कार्य राही कॉम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट करत असून, अशा संस्था ग्रामीण भागासाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन नगर-राहुरी-पाथर्डी मतदारसंघाचे आमदार अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
राही कॉम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व चालू बॅचच्या निरोप समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य काशिनाथ हापसे तसेच मा. आमदार शिवाजीराव कर्डिले महाविद्यालयाचे अध्यक्ष किरण पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार कर्डिले म्हणाले, “आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ प्रमाणपत्र नव्हे, तर प्रत्यक्ष कौशल्य, ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आत्मसात करणे आवश्यक आहे. मोबाईल आणि डिजिटल साधनांचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता स्वतःचे कौशल्य विकसित करण्यासाठी करावा. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार संगणक शिक्षण उपलब्ध करून देण्याचे राही कॉम्प्युटर्सचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.”
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी आणि डिजिटल युगातील विविध क्षेत्रांतील संधींबाबत मार्गदर्शन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी एमएस-सीआयटी (MS-CIT) परीक्षेत ५० पैकी ५० गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. शेख उम्मे ऐमन शेख हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच एमएस-सीआयटी अभ्यासक्रमातील गुणवंत विद्यार्थी, GCC-TBC टायपिंग परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी आणि सारथी, पुणे यांच्या CSMS DEEP डिप्लोमा अभ्यासक्रमातून यश मिळवून स्वावलंबी बनलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.
या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मृणाली ससाणे आणि प्राची पगारे यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन राही कॉम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गीता तोडमल आणि कैवल्य चितळे यांनी प्रभावीपणे केले.
